रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे राबवण्यात येत असलेल्या ‘मा. मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी’ कार्यक्रमांतर्गत ११ नावीन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत १६/१०/२०२५ रोजी हा सोहळा रत्नागिरी येथे संपन्न झाला. पोलीस दलाचे काम अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी पोलीस दलाने हे उपक्रम सुरू केले असून, यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, परप्रांतीय नागरिक, तरुण, तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष सेवा पुरवण्यात येणार आहेत.
पोलीस दलाचे ११ महत्त्वाचे उपक्रम खालीलप्रमाणे :
१. मिशन प्रतिसाद: ज्येष्ठ नागरिकांना तातडीने मदत पुरवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
२. मिशन प्रगती: तक्रारदारांना तक्रार नोंदवल्यानंतर तक्रारीच्या स्थितीबाबतची माहिती एसएमएस/व्हॉट्सॲपद्वारे पुरवली जाईल.
३. मिशन मैत्री: कर्मचाऱ्यांसाठी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे.
४. मिशन गती: दाखल गुन्ह्यांचा जलदगतीने तपास करून, न्यायप्रविष्ट प्रकरणांत दोन दोषारोपपत्र सादर करण्याची कार्यवाही केली जाईल.
५. मिशन संवेदना: महिलांसंबंधी दाखल गुन्ह्यांचा जलद तपास, न्यायालयात सादर करणे आणि गुन्ह्यांची सीडी/डीव्हीडी प्राप्त करून घेण्यासाठी मदत करणे.
६. मिशन परिपूर्ती: पोलीस दलातर्फे राबवण्यात येणाऱ्या डायल ११२ व कॉल रिसीव्ह करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन, त्यांच्या कामाचे निरीक्षण आणि सुधारणा करण्यासाठी हा उपक्रम आहे.
७. मिशन गस्त: रत्नागिरी दलातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत महत्त्वाचे ठिकाण निश्चिती व बारकोड स्कॅन करून रात्रीची गस्त प्रभावीपणे होण्यासाठी हा उपक्रम आहे.
८. मिशन जीवन: रत्नागिरीतील नागरिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा उपक्रम पोलीस दलातर्फे राबवला जाईल.
९. डिजिटल गाववारी: पोलीस ठाण्यातील हद्दीत असणाऱ्या गावांची माहिती डिजिटल स्कॅन करून अपडेट करण्यासाठीची सुविधा.
१०. मिशन निरीक्षण: पोलीस विभागातील सर्व वाहनांचे लोकेशन चेक करणे, पोलीस ठाण्यातील वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवणे.
११. मिशन फिनिक्स: रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थापासून मुक्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवणे.
याप्रसंगी व्यासपीठावर आमदार उदय सामंत, माजी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे रत्नागिरी पोलीस दलाचे कार्य अधिक प्रभावी, लोकाभिमुख आणि पारदर्शक होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.