तुषार पाचलकर, राजापूर
राजापूर शहरासह परिसरातील मोकाट गुरांच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आज तहसील कार्यालयात तातडीची बैठक पार पडली. प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ग्रामस्तरीय समित्या गठित करून विशेष ग्रामसभा घेणे आणि गुरांचे शंभर टक्के इअर-टॅगिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉ. जस्मिन यांनी स्पष्ट केले की, “मोकाट गुरांची समस्या ही फक्त प्रशासनाची नाही, तर सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामपातळीवर समित्या तयार करून सहकार्य करणे गरजेचे आहे.” त्यांनी मोकाट गुरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही निर्देश दिले.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर गुरे रेंगाळल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे उपाययोजनेची मागणी केली होती. आमदार किरण सामंत यांनी याची दखल घेत तातडीची बैठक बोलावण्याचे निर्देश दिले होते.
बैठकीस तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी जाधव, पोलिस निरीक्षक अमित यादव, पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव चोपडे, नगरपालिकेच्या स्वच्छता अभियंता सुप्रिया पोतदार, आरोग्य निरीक्षक अमित पोवार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चेत अरविंद लांजेकर, दीपक नागले, प्रकाश कुवळेकर, रविंद्र नागरेकर, फारुख साखरकर, मनोहर गुरव, दिवाकर आडविरकर, आजीम जैतापकर, मंदार ढेवळे आदींनी सक्रिय सहभाग घेतला. पोलिस निरीक्षक यादव यांनी गुरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाईचे तपशील दिले, तर डॉ. चोपडे यांनी इअर-टॅगिंगद्वारे मालक ओळखण्याची माहिती दिली. नगरपालिका अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कारवाईचा आढावा मांडला.
बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला की विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्तरीय समिती गठित करावी, तसेच पशुसंवर्धन विभागाने गुरांचे १००% इअर-टॅगिंग करून मालकांची नोंद करावी. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी केले.
मोकाट गुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्तरीय समिती व गुरांचे १०० टक्के टॅगिंग : प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांचा आदेश
