पाली : पाली बसस्थानक हे मुंबई गोवा व मिऱ्या नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गावर असून प्रवाशांसाठी ते मध्यवर्ती असल्याने कायमच येथे प्रवाश्यांची वर्दळ असते.त्यामुळे स्थानकाच्या स्वच्छता रहावी यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक या अभियानांतर्गत पाली बसस्थानकाला तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था पाली कडून डस्टबिन चे वाटप करण्यात आले.
संस्थेने नेहमीच सामाजिक, शैक्षणिक व सहकाराला विविध माध्यमातून सहकार्य करण्याकरिता योगदान दिले आहे. संस्थेने पाली बसस्थानकाकरिता डस्टबिन देऊन सामाजिक क्षेत्रामध्ये हातभार लावला आहे. यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर,पाली बसस्थानक वाहतूक नियंत्रक सुनील माळी,प्रदिप सावंत, संस्थेचे अध्यक्ष नितीन कांबळे,उपाध्यक्ष अमोल सावंत, संस्थेचे संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण गुरव,शाखा व्यवस्थापक,कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेकडून डस्टबिन सुपूर्द करण्यात आले.
पाली बसस्थानकाचा कोकण विभागात स्वच्छता अभियानांतर्गत द्वितीय क्रमांक आलेला आहे त्यामुळे अंतिम सर्वेक्षणात गुणांकन कायम राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. एस.टी महामंडळाच्या वतीने तक्षशिला पतसंस्थेचे आभार मानण्यात आले.