GRAMIN SEARCH BANNER

परशुराम घाटात कोसळणाऱ्या संरक्षक भिंतीला प्लास्टिकचा आधार;घाटात एकेरी वाहतूक

Gramin Varta
21 Views

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील महत्त्वाचा परशुराम घाट वाहतुकीसाठी आजही सुरक्षित नाही. या घाटात कोसळलेली सरंक्षक भिंत व खचलेल्या काँक्रिटीकरणाच्या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून प्लास्टीक कापडाचे अच्छादन टाकण्यात आले आहे. याठिकाणचे कामकाज थांबले असून पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही याठिकाणी काही भाग खचत असल्याने एकेरी मार्गावर वाहतूक सुरू ठेवली आहे. दरडीकडील बाजू वाहतूकीस बंद ठेवली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट हा कोकणातील महत्त्वाचा घाट मानला जातो. या घाटाची एकूण लांबी ५.४० किलोमीटर आहे. महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत चिपळूण आणि खेड अशा दोन टप्प्यातील कंत्राटदार कंपनीमध्ये हा घाट विभागला गेला आहे. घाटातील संपूर्ण कॉक्रिटीकरण पुर्ण झाल्यानंतर सरंक्षक भिंतीच्या कामावर लक्ष केंद्रीत केले. मात्र २०२२ मध्येच या काँक्रिटीकरणातील काही भाग खचला. परिणामी त्यावर उपाययोजना म्हणून सरंक्षक भिंत व गॅबीयन वॉल उभारण्याचा निर्णय झाला. परंतु हे काम सुरू असताना अचानक संरक्षक भिंत कोसळली. त्यापाठोपाठ पायथ्यालगत उभारलेल्या गॅबीयन वॉलचा भागही महिनाभरापूर्वी पहिल्याच पावसात खचला.

त्यानंतर आता या ठिकाणचे काम पूर्णतः थांबवण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर गॅबीयन वॉलच्या रचनेत काही किरकोळ बदल करून काम सुरू केले जाणार आहे. तसा प्रस्तावही तयार केला जात आहे. मात्र आता पावसाचा जोर वाढल्याने याठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना म्हणून कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी प्लास्टीकचे अच्छादन टाकण्यात आले आहे. परशुराम घाटातील प्रवास अजूनही सुरक्षित झालेला नाही. एकीकडे लोखंडी जाळ्यांच्या माध्यमातून दरडीचा भाग संरक्षित करण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या खालील बाजूस अजुनही काही ठिकाणी काँक्रिटीकरण खचणे, तडे जाण्याचे प्रकार घडत आहे. तसेच काही ठिकाणी भरावाची मातीही थेट वस्तीत पावसाच्या पाण्यासोबत वाहून जात आहे. या सर्व घडामोडीमुळे राष्ट्रीय महामार्गामार्फत परशुराम घाटातील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

Total Visitor Counter

2645307
Share This Article