सचिन यादव / धामणी : दिवाळीच्या सुट्या म्हणजे मुलांसाठी केवळ आनंदाचा नव्हे, तर सर्जनशीलतेचा ही काळ. कसबा परिसरात या दिवसांत लहानग्या मावळ्यांची लगबग सुरू झाली आहे. हातात कुदळ, फावडी, खोरे, डबे घेऊन ही बालसेना मातीशी पुन्हा नाते जोडत आहे. मोबाईल आणि व्हिडिओ गेमच्या आकर्षणातून बाहेर येत ही पिढी मातीच्या गंधात भिजून इतिहास जिवंत करत आहे.
दिवाळी म्हटली की चिमुकल्यांना आठवतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी काळ, त्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले गड-किल्ले. गावागावात मुले दगड, माती, गवत, विटा, रंग आणि भगवे झेंडे गोळा करून रायगड, प्रतापगड, सिंहगड, शिवनेरी अशा ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारत आहेत. या बालहातांनी उभी केलेली गडबांधणी म्हणजे मराठी संस्कृतीचे जिवंत प्रतीक आणि बालपणाच्या गोड आठवणींचा उत्सव ठरत आहे.
अनेक ठिकाणी आजी-आजोबा नातवंडांना गडबांधणीची कला शिकवत आहेत, तर पालक त्यांना उत्साहाने साथ देत आहेत. ही केवळ मातीची रचना नसून इतिहास, भूगोल आणि बांधकामशास्त्राचा जिवंत धडा ठरत आहे. या माध्यमातून मुलांमध्ये इतिहासाची जाण, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि सर्जनशीलतेचा विकास होत आहे.
काही गावांमध्ये गड-किल्ला स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले असून, मुलांनी आपल्या कल्पकतेने विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही गडबांधणी परंपरा म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि अभिमानाचा संगम ठरली आहे.
कसबा सुतारवाडीतील बच्चेकंपनीचा “मल्हारगड” उठावदार आकर्षण
कसबा सुतारवाडी येथील अथर्व परशुराम बोंडकर, आदित्य अनिल पेढामकर, वेदांत मंगेश सप्तीस्कर, स्मित संतोष बोंडकर आणि राजवीर योगेश सप्तीस्कर या पाच पांडवांच्या कल्पक हातून ‘मल्हारगड किल्ला’ उभारण्यात आला आहे. त्यांच्या मेहनतीने साकारलेला हा किल्ला परिसरातील आकर्षणाचे केंद्र ठरला असून, पाहणाऱ्यांचे कौतुक ओसंडून वाहत आहे.
दिवाळी सुट्यांमध्ये लहान मावळ्यांची लगबग; चिमुकले उभारताहेत शिवकालीन गड-किल्ले







