रत्नागिरी: मस्तकात पुस्तके भरलेली असतील तर कोणीही आपल्याला अविचारांची टोपी घालू शकत नाही. जे वितळून जाईल ते फेकून दिले पाहिजे, जे उजळून निघेल त्याचा स्वीकार केला पाहिजे. आपापले धर्मग्रंथ वाचणारे कधीच दंगली करत नाहीत.
क्षमा हे ज्ञानी माणसाचे सर्वांत जवळचे लक्षण आहे. असे प्रतिपादन कवी अनंत राऊत यांनी केले.
राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या प्रबोधनकार ठाकरे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुरुवर्य शहाजी भाऊराव खानविलकर सभागृहात हा समारंभ झाला. स्पर्धेचे हे विसावे वर्ष होते.
स्पर्धेत नागपूरचा अनिकेत वनारे आणि पुण्यातील अनुष्का बिराजदार आणि प्रथमेश चव्हाण युवा वक्ता पुरस्काराचे मानकरी ठरले. स्पर्धेत नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी येथून २३ स्पर्धक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर होते. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध कवी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा फेम अनंत राऊत उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, उपाध्यक्ष अरविंद गोसावी, कार्यवाह अॅड. गुरुदत्त खानविलकर, महादेव धुरे, चंद्रकांत बावकर, नारायण शेलार, गणपत जानस्कर, परीक्षक रवींद्र खैरे, रवींद्र राऊत, प्रशांत गुरव, नामदेव तुळसणकर, विवेक सावंत, शाळा समिती अध्यक्ष विजयकुमार वागळे, सौ. प्रज्ञा तुळसणकर, डॉ. शैलेश शिंदेदेसाई, अॅड. एकनाथ मोंडे, गणेश गांधी, मुख्याध्यापक विनोद मिरगुले व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक विनोद मिरगुले म्हणाले, अनंत राऊत हे महाराष्ट्रातील तरुणांमध्ये घोंघावणारे विचारांचे वादळ आहे. आपले विचार व्यक्त करताना परीक्षक रवींद्र खैरे म्हणाले, अनंत राऊत हे शब्दांचे जादूगार आहेत. ओणीची स्पर्धा ही माणूस घडविणारी कार्यशाळा आहे असे स्पर्धेबद्दल उद्गार खैरे यांनी काढले. प्रबोधनकारांच्या कार्याची थोरवी सांगावी तेवढी कमीच आहे. कृतीतून प्रबोधन करणारे म्हणजेच प्रबोधनकार. असे अध्यक्षीय मनोगतात वासुदेव तुळसणकरांनी उद्गार काढले.
कवी अनंत राऊत यांनी श्रोत्यांसमोर मैत्री, प्रेम, राजकारण, समाजसेवा, भक्ती अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या. श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.
प्रबोधनकार ठाकरे युवा वक्ता पुरस्काराचे मानकरी असे – १) अनिकेत रामा वनारे – संताजी महाविद्यालय, नागपूर. २) अनुष्का यशवंत बिराजदार – सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे. ३) प्रथमेश राहुल चव्हाण – बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
उपविजेते – १) सानिया उदय यादव – कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, लांजा. २) बिल्वा गणेश रानडे – फाटक हायस्कूल, रत्नागिरी. ३) आदित्य ज्ञानेश्वर दराडे – माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, छत्रपती संभाजीनगर
विजेत्यांना रोख ७ हजार ५०० रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तर उपविजेत्यांना रोख दोन हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरी : धर्मग्रंथ वाचणारे कधीच दंगली करत नाहीत – कवी अनंत राऊत
