रत्नागिरी: महाराष्ट्र पोलीस दलाचा ‘रेझिंग डे’ आणि राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा पोलीस दल व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भव्य ‘हेल्मेट जनजागृती रॅली’ काढण्यात आली. दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करण्याचे महत्त्व नागरिकांच्या मनावर बिंबवणे आणि वाहतूक नियमांचे पालन करून रस्ते अपघात रोखणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता. बुधवारी सकाळी रत्नागिरीतील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयापासून या रॅलीला प्रारंभ झाला. तेथून नाचणे रोड, मारुती मंदिर, जयस्तंभ आणि मिरकरवाडा या मार्गावरून मार्गक्रमण करत रॅलीची सांगता पुन्हा परिवहन कार्यालयात झाली.
या विशेष उपक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दुचाकी अपघातात होणाऱ्या जीवितहानीवर चिंता व्यक्त केली. हेल्मेट हे केवळ कायद्याचे पालन नसून ते आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नागरिकांनी स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी प्रवास करताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे रॅलीदरम्यान विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या काही दुचाकीस्वारांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते निशुल्क हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी सहाय्यक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील, मोटार वाहन निरीक्षक प्रशांत जाधव आणि सहाय्यक निरीक्षक आनंद शिंदे यांच्यासह आर.टी.ओ. विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच या मोहिमेत रत्नागिरी पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध वाहन विक्रेत्यांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस दल आणि परिवहन विभागाने राबवलेल्या या संयुक्त मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.







