देवगड | प्रतिनिधी :
यंदा वेळेआधीच आंबा हंगामाचा शुभारंभ झाला असून देवगड हापूसची पहिली पेटी सोमवारी वाशी फळबाजाराकडे रवाना झाली. तालुक्यातील पडवणे येथील एका आंबा बागायतदार शेतकऱ्याने सुमारे पाच डझन हापूस आंब्यांची लाकडी पेटी विधीवत पूजा करून वाशी येथे पाठवली. विशेष म्हणजे ही पेटी उद्या (ता. २१) लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर विक्रीसाठी फळबाजारात उपलब्ध होणार आहे.
गतवर्षी मेच्या मध्यावर अवकाळी पाऊस आणि त्यानंतरच्या सक्रिय मॉन्सूनमुळे आंबा हंगाम अकाली संपला होता. मात्र यंदा उलट परिस्थिती पाहायला मिळत असून, ऑक्टोबर महिन्यातच देवगड हापूस मुंबई गाठत आहे.
पडवणे परिसरातील या बागायतदाराच्या कलमबागेत पावसाळ्यातच मोहोर आल्याने त्यांनी त्याची काळजीपूर्वक जोपासना केली. परिणामी उत्कृष्ट फळधारणा झाली आणि पहिल्याच फळांमधून पाच डझन आंब्यांची पेटी वाशी बाजारात पाठवण्यात आली.
दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर मुंबई बाजारात देवगड हापूस दाखल झाल्याने व्यापारी व बागायतदार दोघांमध्येच उत्सुकता आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विक्रीसाठी उपलब्ध होणाऱ्या या पहिल्या हापूस पेटीला काय भाव मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवगडमधून पहिली हापूस आंबा पेटी वाशीकडे रवाना
