GRAMIN SEARCH BANNER

खेड: भरधाव डंपरने एसटीला धडकून दुचाकीस्वार पती-पत्नी जखमी

खेड: खेड-दापोली मार्गावरील बहिरवली फाट्याजवळ सोमवारी सायंकाळी भरधाव डंपरने एसटी बसला घासून दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, डंपरचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत सुभाष जगताप (२६) आणि सोनाली संकेत जगताप (२४) (दोघेही रा. शेल्डी-गावठाण, खेड) अशी जखमी पती-पत्नींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी चालक रमेश योगाजी कामेटे (४४) हे ‘एमएच २०/बीएल २५८०’ क्रमांकाची बस घेऊन खेडहून दापोलीकडे जात होते. त्याचवेळी दापोलीच्या दिशेने येणाऱ्या ‘एमएच ०८/डब्ल्यू ८२०५’ क्रमांकाच्या डंपरने एसटी बसला बाजूने घासून पुढे येणाऱ्या जगताप यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जगताप दाम्पत्य जखमी झाले.

अपघातानंतर डंपरचालकाने तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. दुचाकीस्वाराने डंपरला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, तो आणखी वेगाने पळून गेला. जखमी दुचाकीस्वाराने दिलेल्या डंपरच्या क्रमांकावरून खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस फरार डंपरचालकाचा कसून शोध घेत आहेत. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

Total Visitor Counter

2455622
Share This Article