GRAMIN SEARCH BANNER

हर्णे बंदरात म्हाकळाची मुबलक आवक

Gramin Varta
133 Views

दापोली : दापोली तालुक्यातील प्रसिद्ध हर्णे बंदरात सध्या म्हाकुळ मासळीचा हंगाम ऐन भरात आला आहे. बंदरावर मच्छीमार नौकांची गर्दी, लिलावासाठी सुरु असलेला गोंगाट तसेच मासळीच्या वासाने दरवळलेले वातावरण असे चित्र सध्या हर्णे बंदरावर पाहायला मिळत आहे.मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या म्हाकळामुळे मच्छीमारांमध्ये उत्साह आहे.

बंदरात मुंबलक प्रमाणात मिळालेल्या म्हाकुळ प्रकारातील मासळीला स्थानिक पातळीवर किलोला 300 ते 350 रुपये किलो असा दर मिळत असून, लिलावाची रंगत वाढत आहे. म्हाकुळ ही हिवाळ्यात मिळणारी चवदार समुद्री मासळी म्हणून प्रसिद्ध आहे. साधारणपणे ऑक्टोबरपासून जानेवारीपर्यंत या मासळीची आवक मोठ्या प्रमाणात होते. तिचे मांस मऊ, रसाळ आणि पौष्टिक असल्याने घराघरात तसेच हॉटेलांमध्येही ती खवय्यांमध्ये ‌’पहिली पसंती‌’ ठरत आहे.

दापोली तालुक्यातील हर्णे बंदरावर दररोज लिलावाची लगबग सुरू असते. म्हाकळासह सुरमई, बांगडा, कोळंबी, पापलेट आदी मासळीही उपलब्ध होते. मात्र, सध्या म्हाकळानेच बाजारपेठ गाजवली आहे.

म्हाकूल फ्राय, म्हाकूल करीवर पर्यटकांचा ताव

दिवाळीच्या सुट्टीमुळे दापोलीत पर्यटकांचा ओघ वाढला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्स आणि खानावळींमध्ये ‌’म्हाकुल फ्राय‌’ आणि ‌’म्हाकुल करी‌’ची चव चाखण्यासाठी पर्यटक दिसत आहेत. समुद्राच्या गार वाऱ्यात, तव्यावरच्या म्हाकुळच्या घमघमाटाने दिवाळीचा आनंद अधिकच वाढवला आहे.

Total Visitor Counter

2681404
Share This Article