GRAMIN SEARCH BANNER

मॉर्निंग वॉक करणाऱ्या पादचाऱ्याला कुवारबाव येथे टेम्पोची धडक; अपघातानंतर चालक पसार

Gramin Varta
296 Views

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर पहाटेच्या सुमारास देवदर्शनावरून चालत घरी परतणाऱ्या एका पादचाऱ्याला भरधाव वेगातील टेम्पोने जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून, धडक दिल्यानंतर घटनास्थळी न थांबता टेम्पो चालक वाहन घेऊन पसार झाला आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गयाळवाडीच्या पुढील बाजूस असलेल्या हॉटेल चितारा समोर घडली. याप्रकरणी उपचारांनंतर रविवारी सायंकाळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक यशवंत केळकर (वय ४९, रा. सुयोग सोसायटी, कुवारबाव) असे या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक केळकर हे २० नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता मॉर्निंग वॉक करत रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरून खेडशी येथील श्री महालक्ष्मी मंदिराकडे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते पुन्हा महामार्गाच्या डाव्या बाजूने चालत कुवारबाव येथील आपल्या घरी परतत होते. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ते गयाळवाडीच्या पुढे असलेल्या हॉटेल चितारा समोर आले असता, विरुद्ध दिशेने समोरून आलेल्या टेम्पो (क्रमांक एम.एच. ०८/ए.पी./७२८७) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवत दीपक यांना समोरून जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे दीपक केळकर रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या कपाळाला, उजव्या हाताला, डाव्या बाजूच्या बरगड्यांना तसेच दोन्ही पायांना मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर जखमीला मदत करण्याऐवजी टेम्पो चालकाने आपले वाहन न थांबवता तेथून पळ काढला. जखमी दीपक केळकर यांनी उपचार घेतल्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी एम.एच. ०८/ए.पी./७२८७ क्रमांकाच्या अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (ब) आणि १८७ अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस फरारी चालकाचा शोध घेत आहेत.

Total Visitor Counter

3073036
Share This Article