रत्नागिरी : ऐन सणासुदीच्या तोंडावरच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने रेशन कार्ड धारकांना मोठा दणका दिला आहे. केवायसी न केलेल्या व सलग सहा महिने धान्याची उचल न करणा-या रेशन कार्डधारकांचे धान्य वितरण बंद करण्यात आले आहे.
आता पर्यत रत्नागिरी जिल्ह्यातील १६ हजार १८५ रेशनकार्डधारकांना याचा फटका बसला आहे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाची ही प्रथमच केलेली मोठी कारवाई आहे. सलग सहा महिने रेशनवर धान्याची उचल न केल्यास शिधापत्रिका आपोआप निष्क्रिय झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील १६ हजार १८५ रेशनकार्डधारकांचे धान्य बंद करण्यात आले असून त्यामध्ये १४ हजार ३६ प्राधान्य गटातील तर २ हजार १४९ अंत्योदय गटातील रेशन कार्डधारकांचा समावेश आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २ लाख ८२ हजार २७३ शिधापत्रिका असून, त्यावर ११ लाख ३१ हजार २५६ नोंदणीकृत लाभार्थी आहेत.
धान्य वितरण थांबविण्यात आलेल्या रेशन कार्डधारकांंमध्ये मंडणगड तालुक्यातील ७९४, दापोली तालुक्यातील १ हजार ६९४, खेड तालुक्यातील १ हजार ८२०, गुहागर तालुक्यातील १ हजार ४९, चिपळूण तालुक्यातील ३ हजार २३७, संगमेश्वर १ हजार ९२९, रत्नागिरी तालुक्यातील २ हजार ७९२, लांजा तालुक्यातील १ हजार २०९ तसेच राजापूर तालुक्यातील १ हजार ६६१ रेशन कार्डधारकांचे रेशन धान्य बंद करण्यात आले आहे.
याबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल २ लाख ७८ हजार ३७६ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप ही पुर्ण झालेली नाही. त्यामुळे अशा लोकांचे देखील रेशनवरील धान्य पुरवठा थांबण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १६,१८५ रेशनकार्डधारकांचे धान्य वितरण बंद
