GRAMIN SEARCH BANNER

दापोली: ८४ गावांचे श्रद्धास्थान असलेल्या गावतळे येथील झोलाई देवी मंदिरात चोरी; १४ पितळी घंटा चोरट्यांनी केल्या लंपास

Gramin Varta
137 Views

दापोली: तालुक्यातील अत्यंत पुरातन आणि ८४ गावांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावतळे येथील श्री झोलाई देवी मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सोमवारी, १२ जानेवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या परिसरातील आणि गाभाऱ्यातील सुमारे १४ पितळी घंटा चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी बाळकृष्ण गुरव हे नेहमीप्रमाणे पूजेसाठी आले असता, त्यांना मंदिरातील घंटा गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना देताच गावकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. चोरट्यांनी नियोजनबद्धरीतीने ही चोरी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मंदिराच्या पायऱ्यांजवळील पहिली घंटा, गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी असलेली सुमारे १५ किलो वजनाची मोठी घंटा आणि दैनंदिन पूजेसाठी वापरली जाणारी छोटी घंटा (घाट) चोरट्यांनी लंपास केली आहे. याशिवाय एकत्र बांधलेल्या ७ घंटा आणि शेजारीच असलेल्या श्री मानाई देवी मंदिरातील समोरील व आतील ३ घंटा असा एकूण १४ घंटांचा ऐवज चोरून नेला आहे. मोठी घंटा काढण्यासाठी चोरट्यांनी खुर्चीचा आधार घेतल्याचे खुणांवरून स्पष्ट होत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झोलाई देवी मंदिर, मानाई देवी मंदिर आणि नजीकच्या स्मशानभूमी परिसराची कसून पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना यादव यांनी सांगितले की, पोलीस सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोमवारी शेजारच्या गावात आठवडा बाजार असल्याने त्या अनुषंगानेही काही धागेदोरे मिळतात का, याची चाचपणी सुरू आहे. गावतळे येथील हे मंदिर अतिशय जागृत देवस्थान असून येथे मुंबई, पुण्यासह संपूर्ण कोकणातून भाविकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामस्थांना सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या आणि गावात येणाऱ्या अनोळखी फेरीवाल्यांवर निर्बंध घालण्याच्या सूचना केल्या आहेत. या चोरीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावण्याची मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3199398
Share This Article