GRAMIN SEARCH BANNER

कळझोंडीचा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’; ग्रामस्थ आक्रमक, ९ डिसेंबरला छेडणार जनआंदोलन

Gramin Varta
577 Views

गणपतीपुळे | वैभव पवार

रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावाला जोडणारा मुख्य रस्ता अक्षरशः जीवघेणा बनला असून, खड्डे, तुटलेली साईट पट्टी आणि खचलेले रस्ते यामुळे दररोज प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना “प्रवास नाही, तर जीव वाचवण्याची कसरत” करावी लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

एसटी, दुचाकी, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

कळझोंडी क्रमांक १ ते कळझोंडी क्रमांक २ या मार्गावर सतत एसटी बसेस, दुचाकी, रिक्षा, ट्रक यांची वर्दळ असते. शालेय विद्यार्थी, कर्मचारी, उद्योजक आणि आजारी व्यक्ती या मार्गावरून रोज प्रवास करतात. मात्र रस्त्यावरील खोल खड्डे, उखडलेला डांबर आणि कडेला आधार नसल्याने हा मार्ग ‘अपघाताला आमंत्रण’ देणारा ठरला आहे.

तिसंग – धरण मार्ग पूर्णपणे खचला

कळझोंडी क्रमांक २ ते तिसंग मार्गावरील रस्ता उखडून गेला असून, वाहनांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. पुढे तिसंग ते धरण मार्ग तर अत्यंत धोकादायक बनला आहे. धरणाच्या बाजूला प्रचंड पाण्याचा साठा असताना रस्त्यावर भेगा गेलेल्या आहेत आणि कोणत्याही क्षणी वाहन घसरून मोठा अपघात होऊ शकतो. या मार्गावर संरक्षण भिंत नसल्याने भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे.

बीएसएनएल टॉवर बिघाड – नागरिकांची कामे ठप्प

गावातील बीएसएनएल टॉवर सतत बिघडत असल्याने नागरिकांना शासकीय कामकाज, ऑनलाईन व्यवहार आणि दैनंदिन संपर्कात मोठा अडथळा निर्माण होत आहे.

पाणी प्रकल्प पूर्ण, तरीही पुरवठा ‘गायब’

गावातील धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले असतानाही नवीन पाईपलाइन सुरू करण्यात आलेली नाही. मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही पुरवठा सुरळीत नाही, याबद्दल ग्रामस्थ प्रश्न उपस्थित करत आहेत.

एसटी सेवा अनियमित – प्रवाशांचा संताप

कळझोंडी गावातून जाणारी दुपारी १ वाजताची एसटी अनियमित असते. अनेकदा ही फेरी अचानक बंद केली जाते. संध्याकाळची ५.३० ची एसटी बस तर वर्षभरापूर्वीच बंद करण्यात आली आहे. यामुळे शाळकरी मुले, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक प्रचंड अडचणीत आहेत.

पत्रव्यवहार, ठराव… तरीही प्रशासन गप्प

ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार, ठराव आणि विनंत्या करूनही संबंधित विभागांकडून कोणतीच हालचाल न झाल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला आहे. सरपंच सौ. दीप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार, ग्रामसेवक अमोल केदारी तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी याबाबत जनतेला माहिती दिली आहे.

९ डिसेंबरला मोठे जनआंदोलन

शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कळझोंडी ग्रामस्थांनी ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता कळझोंडी फाटा नं. २ (निवडी–जयगड रोड) येथे भव्य ‘धरणे जनआंदोलन’ उभारण्याची घोषणा केली आहे. महादेव आग्रे, संदीप पवार, पांडुरंग सनगरे, के.आर. पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तयारी सुरू केली असून गावात जनजागृती जोरात सुरू आहे.

या आंदोलनाची निवेदने १ डिसेंबर रोजी मा. जिल्हाधिकारी आणि मान. उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांना देण्यात येणार असल्याची माहिती श्री. महादेव आग्रे यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली.

Total Visitor Counter

3072289
Share This Article