राजापूर : तालुक्यातील नाटे येथील गॅस एजन्सीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या सात जणांची रत्नागिरी सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये घडलेल्या या घटनेने राजापूर तालुक्यात खळबळ उडवून दिली होती. स्वप्नील गजानन गोठणकर (रा. राजापूर) यांनी नाटे पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
ज्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, त्यांची नावे अशी आहेत: राजेश वासुदेव गावकर (३०), समिक्षा राजेश गावकर (२४), वासुदेव महादेव गावकर (६२), स्वप्ना वासुदेव गावकर (५३), योगेश वासुदेव गावकर (५३, पाचही रा. अणसुरे, ता. राजापूर), तसेच सचिन मधुकर वाघधरे (५२) आणि सुरज सचिन वाघधरे (२६, दोघे रा. माडबन, ता. राजापूर). रत्नागिरी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी या खटल्याचा निकाल दिला, तर आरोपींच्या वतीने ॲड. मच्छींद्र आंब्रे यांनी बाजू मांडली.
खटल्यातील माहितीनुसार, तक्रारदार स्वप्नील गोठणकर यांनी नाटे येथील आपली मालकीची गॅस एजन्सी आर्थिक व्यवहारामुळे झालेल्या वादामुळे राजेश गावकर यांच्याकडून चालविण्यासाठी परत ताब्यात घेतली होती. याच गोष्टीवरून दोघांमध्ये वाद धुमसत होता. २२ सप्टेंबर २०२१ रोजी राजेशने एजन्सीच्या कार्यालयाला आणि गोडाऊनला टाळे ठोकले होते. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी स्वप्नील गोठणकर हे ते टाळे काढण्यासाठी गेले असता, संशयित आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. तथापि, सुनावणीदरम्यान सरकारी पक्ष आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करू शकला नाही. यानंतर महत्त्वपूर्ण पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला आहे.