माथेरान: दोन दिवस रात्रभर मुसळधार पाऊस… धुक्याचा गडद पडदा… आणि माथेरानच्या इको पॉइंटजवळून ऐकू येणारा एक हलकासा पण हृदय चिरणारा आवाज… तो आवाज होता एका निष्पाप कुत्र्याचा, जो २०० फूट खोल दरीत अडकला होता… एकटा, थरथर कापत होता… जीव वाचवण्यासाठी आर्तपणे ओरडत होता. परंतु पाण्याच्या आणि वाऱ्याच्या आवाजाने त्याचा आवाज दाबून टाकला होता. तरीही तो थरथरत्या अंगाने ओरडत होता.
दोन दिवस… भुकेने व्याकूळ, पावसाने पूर्ण भिजलेला आणि थंडीने गारठलेला तो जीव फक्त एका मदतीच्या हाकेसाठी आर्ततेने रडत होता. पण त्या अंधाऱ्या दरीत कोणाला त्याची हाक ऐकू येणार. मात्र त्याची जगण्याची जिद्द कायम होती.
अखेर परमेश्वरालाही पाझर फुटला
त्या दरीजवळून जाणाऱ्या काही स्थानिकांनी त्याचा आवाज ऐकला, आणि तात्काळ माहिती ‘Sahyadri Mitra Emergency Team’ पर्यंत पोहोचवली. कोणताही विलंब न करता ही टीम घटनास्थळी पोहोचली. पावसाने चिखल झालेली ती घसरडी वाट, हवेत धुक्याचा अंधार, आणि समोर त्या खोल दरीचा जबडा… पण या सर्व संकटांच्या पार, चार धाडसी तरुण त्या आवाजाच्या दिशेने उतरली. त्यांच्या मनात फक्त एकच विचार हा जीव वाचायलाच हवा.
सुनिल ढोले, नाईक, चेतन काळमे आणि उमेश मोरे हे चार नावे त्या दिवसाची एक अमिट कहाणी लिहून गेली. त्यांनी पावसाची, थंडीची आणि खोल दरीची पर्वा न करता त्या श्वानापर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला. श्वान त्यांच्याकडे पाहून रडतच होता, थरथरत होता… पण त्याच्या डोळ्यांत आशा होती, एक जीव वाचण्याची आस.
त्यांनी त्याला बिस्किटं दिली, त्याच्या कंप पावलांवर हात फिरवला. जणू सांगितलं. ‘आता तू एकटा नाहीस.’ त्या क्षणी त्या श्वानाचे डोळे थोडेसे मिटले. भीतीने नव्हे, तर विश्रांतीने… कारण त्याला माणुसकीचा स्पर्श लाभला होता.नंतर अत्यंत काळजीपूर्वक त्यांनी त्याला वर खेचलं. त्याचं शरीर थरथरत होतं, पण जिवंत होता. जिवंत! आणि तेवढंच पुरेसं होतं.आज तो श्वान सुरक्षित आहे, कारण कुणीतरी त्याच्या आर्त आवाजाकडे कान दिला, त्याच्या वेदनेला प्रतिसाद दिला… आणि मृत्यूच्या छायेतही माणुसकीला जिंकवलं.
थरकाप…! दोन दिवस खोल दरीत अडकलेल्या, पावसाने भिजलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या कुत्र्याला तरुणांनी दिले जीवदान!
