पुणे: गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकावरून दोन साप्ताहिक रेल्वे कोकणच्या दिशेने सोडण्याचे नियोजन केले आहे.
पुणे – रत्नागिरी – पुणे या मार्गावर गाड्या धावणार असल्याने भाविकांना दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवात दर वर्षी कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) जादा बस सोडण्यात येणार असल्या, तरी प्रवाशांची संख्या जास्त असते. बहुतांश भाविक खासगी वाहनाचा पर्याय निवडतात. मात्र, रस्ते मार्गांवर असणारी वाहतूक कोंडी, टोल या समस्यांमुळे प्रवास अधिक खर्चिक आणि त्रासदायी होतो. रेल्वे प्रशासनाकडून दर वर्षी एक अतिरिक्त गाडी सोडण्यात येत असली, तरी आरक्षणही पूर्ण असते. त्यामुळे भाविकांकडून अतिरिक्त गाडी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मध्ये रेल्वे विभागाने पुण्यातून यंदा दोन साप्ताहिक गाड्या सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले असून, मंगळवारपासून (५ ऑगस्ट) ऑनलाईन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी दिली.
गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून दोन साप्ताहिक रेल्वे कोकणच्या दिशेने सोडण्याचे नियोजन
