संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील कुंडी धावडेवाडी येथील २१ वर्षीय तरुणाने विष प्राशन केल्याची घटना बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सोहम राजाराम पवार असे विष प्राशन केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याला अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहमची प्रेयसी गेल्या चार-पाच दिवसांपासून त्याच्याशी बोलत नव्हती. याच रागातून सोहमने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
विष प्राशन केल्यानंतर सोहमला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला प्रथम देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याने विष प्राशन केल्याची बाब उघड झाली. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.