GRAMIN SEARCH BANNER

‘लाडक्या बहिणींची’ सुरक्षा आता महिलांच्याच हाती! एसटी स्थानकांवर महिला रक्षकांचा खडा पहारा

Gramin Varta
178 Views

मुंबई : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यादृष्टीने राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने एक पाऊल पुढे टाकले आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आता महिला सुरक्षा रक्षकांवर सोपवण्यात आली आहे.

सध्या एसटी महामंडळाच्या ४८ प्रमुख बस स्थानकांमध्ये महिला सुरक्षा रक्षक आहेत. गेल्या नऊ महिन्यांत त्यांच्या माध्यमातून ७०६ घटनांचा उलगडा करण्यात आला असून त्यापैकी ३० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येत्या काळात एसटी महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवर महिला सुरक्षा रक्षकांची संख्येत वाढ केली जाईल.

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या विशेषत: महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सुरक्षा व दक्षता खात्यामार्फत ४८ प्रमुख बसस्थानकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेला बळकटी आली. एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता खात्याच्या माध्यमातून, महिला सुरक्षा रक्षकांनी प्रवाशांची सुरक्षा, घातपातापासून दक्षता, सामाजिक दृष्ट्या दुर्बळ घटकांबद्दल जागरूकता आणि प्रवाशांना मदत करणे ही महत्त्वाची कामे हाती घेतली.

त्यानुसार जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत सर्व स्थानकांवर पाकीटमार, चोरी, महिला छेडछाड, घर सोडून आलेल्या महिलांना मदत, मनोरूग्णांना मदत यासारख्या ७०६ घटनांमध्ये सुरक्षा रक्षकांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. त्यापैकी ३० प्रकणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.

या कालावधीत १८२ प्रकरणांमध्ये महिला, विद्यार्थिनींची छेडछाड, महिलांचे दागिने, पैसे चोरणे, मनोरुग्ण महिलांना व घर सोडून आलेल्या महिलांना मदत करणे अशा विविध गुन्हेगारी व सामाजिक स्वरूपाच्या घटनांना सुरक्षा रक्षक व महिला सुरक्षा रक्षकांनी अत्यंत दक्षतेने हाताळून चांगली कामगिरी केली.

प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना

सुरक्षा व दक्षता खात्याच्या या कामगिरीचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सुरक्षा रक्षकांना अधिक दक्ष राहण्याबाबत व कामगिरी सुधारण्याबाबत वारंवार सूचना देण्यात येतात. त्यानुसार सुरक्षा रक्षकांकडून कार्यक्षम आणि दक्षतेची कामगिरी सातत्याने होत आहे. परिणामी, सुरक्षा रक्षकांनी व महिला सुरक्षा रक्षकांनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे, महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणाऱ्या घटनांना प्रभावीपणे आळा घालण्यात मोठे यश मिळाले आहे, असे एसटी महामंडळाने सांगितले.

Total Visitor Counter

3366895
Share This Article