GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत घरासमोर उभी केलेली मारुती सुझुकी इको कार लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
87 Views

दापोली:दापोली शहरालगतच्या उदयनगर परिसरातील युगांत पार्क बी-विंगच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने ३ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी इको कार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिल अनंत मोरे (वय ६०, रा. युगांत पार्क, प्लॉट नं. २०५, उदयनगर, दापोली) यांचा किराणा आणि रेशन दुकानाचा व्यवसाय आहे. त्यांनी आपली सिल्व्हर रंगाची मारुती सुझुकी इको सात सीटर कार (क्रमांक MH 08 AN 9705) दि. २८ मार्च २०२६ रोजी रात्री ९.१५ वाजता युगांत पार्क बी-विंगच्या पार्किंगमध्ये नेहमीप्रमाणे पार्क केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास त्यांना आपली कार त्या ठिकाणी दिसून आली नाही. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही गाडी मिळून न आल्याने त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेतली.

अज्ञात चोरट्याने दि. २८ मार्चच्या रात्री ते २९ मार्चच्या सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी ही ३ लाख रुपये किमतीची कार चोरून नेली आहे. या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) आणि गु.आर.क्र. ४५/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून भरवस्तीतून कार चोरीला गेल्यामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Total Visitor Counter

3388211
Share This Article