तुषार पाचलकर / राजापूर
मागील काही महिने राजापूर एसटी आगाराचे विस्कळीत झालेले वेळापत्रक अद्यापही रुळावर यायला तयार नाही अशीच स्थिती सध्या असून राजापूर आगारातून सायंकाळी सुटणाऱ्या वस्तीच्या गाड्या प्रचंड विलंबाने धावत असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान राजापूर आगाराच्या या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
मागील काही महिने राजापूर आगारातुन सुटणाऱ्या बसेस विलंबाने धावत असून त्यामुळे प्रवाशांना तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांमधून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सायंकाळी राजापूर आगारातून तालुक्याच्या विविध गावांसाठी सुटणाऱ्या बसेस विलंबाने धावत असून त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
दररोज राजापूर शहरात शासकीय तसेच विविध कामांसाठी, खरेदीसाठी आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येत असतात. शासकीय कामांसाठी आलेले नागरिक सायंकाळी उशिरा आपापल्या गावी परतत असतात. त्यावेळी वेळेवर गाडी सुटत नसल्याने बसची वाट पहात ताटकळत उभे राहावे लागते.
गेले काही दिवस राजापूर आगाराच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये अनियमितता आली असून बऱ्याच गाड्या वेळेवर सुटत नाहीत. हा येथील कटू अनुभव प्रवाशांनी तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे. सायंकाळी सुटणाऱ्या वस्तीच्या गाड्या तर खूपच विलंबाने राजापूर आगारातून सुटतात. असे चित्र सातत्याने पहावयास मिळत आहे. सायंकाळच्या वेळी सुटणाऱ्या जैतापूर, येरडव, आंबा,बुरांबेवाडी, यासह अन्य काही गाड्या तर त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास विलंबाने राजापूर आगारातून सुटत आहेत. काही वेळा तर त्याहून अधिक उशीर होतो. असेही प्रकार घडत असतात. काही वेळा तर प्रवाशांना कोणतीच पूर्व कल्पना न देता बस अचानक रद्द केल्याचे प्रकार देखील घडले आहेत. त्यामुळे राजापूर आगारात नेमके चाललंय तरी काय असे संतप्त सवाल आता प्रवाशांमधून विचारले जात आहेत.
विलंबाने बस सुटत असल्याने दुरवरच्या प्रवाशांना त्यांच्या घरी पोचायला खूप उशीर होतो. त्यामुळे राजापूर एसटी आगाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव सणाच्या काळात राजापूर आगारातून काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचा प्रवाशांना फटका बसला होता.राजापूर आगाराच्या अशा कारभाराबद्दल प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.