मुंबई : भारतीय रेल्वे तत्काळ तिकीट आरक्षणासाठी नवीन ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली टप्प्याटप्प्याने अंमलात आणत आहे. मध्य रेल्वेवरील पाच रेल्वेगाड्यांमध्ये तत्काळ तिकीट आरक्षणासाठी ही नवीन ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली शुक्रवारपासून लागू करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ११०२९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोंडा गोदान एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०२५ पुणे जंक्शन – अमरावती एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१५७ पुणे जंक्शन – सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांमध्ये ओटीपी आधारित प्रमाणीकरण प्रणाली शुक्रवारी सुरू करण्यात येणार आहे.
ही नवीन प्रणाली संगणकीकृत पीआरएस खिडकी, अधिकृत दलाल, तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळ आणि ॲपद्वारे आरक्षित करण्यात येणाऱ्या तत्काळ तिकिटांसाठी लागू आहे. या प्रक्रियेनुसार आरक्षणाच्या वेळी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर प्रवाशांना एकदाच वापरता येणारा संकेतांक (ओटीपी) प्राप्त होईल. ओटीपीची यशस्वी पडताळणी झाल्यानंतरच तत्काळ तिकीट जारी करण्यात येईल.
या उपाययोजनेचा उद्देश पारदर्शकता अधिक मजबूत करणे, गैरवापर रोखणे तसेच तत्काळ कोट्यातील बुकिंगचा लाभ खऱ्या प्रवाशांपर्यंत पोहोचवणे हा आहे. तत्काळ तिकीट आरक्षणाच्या वेळी गैरसोय टाळण्यासाठी मोबाइल क्रमांक अचूकपणे नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले.
भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्यांची तिकिटे आरक्षित करण्यास प्रचंड कसरत करावी लागते. तर, प्रतीक्षा यादीतील तत्काळ तिकिटे मिळत असल्याने, प्रवाशांना रेल्वे प्रवासापासून वंचित राहावे लागते. भारतीय रेल्वेमध्ये तत्काळ तिकीट काढताना गडबड होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले. तत्काळ तिकिटाचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत तिकिटे प्रतीक्षा यादीत जातात, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.
ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य
तत्काळ तिकीटे काढण्यास सुरुवात झाल्यानंतर ती ३० मिनिटांच्या कालावधीपर्यंत आरक्षित होणार नाहीत. यासह १ जुलै २०२५ पासून फक्त आधार प्रमाणित वापरकर्त्यांना इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळ आणि ॲपद्वारे तत्काळ तिकिटे आरक्षित करता येतील. तर, १५ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकीट काढण्यासाठी आधार आधारित ‘ओटीपी’ प्रमाणीकरण देखील अनिवार्य करण्यात आले आहे.
तत्काळ तिकीट आरक्षणासाठी ओटीपी आधारित प्रमाणीकरण प्रणाली आजपासून लागू






