आंगवली (वार्ताहर): राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) आंगवली विकास मंडळ, मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवलीच्या विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. एनसीईआरटीमार्फत राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत विद्यालयाचे १० विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मारलेली ही मजल कौतुकास्पद ठरत आहे.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी शाळेतून एकूण १८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तन्वी संतोष बेटकर, आराध्य अनिल गोरुळे, नेहा सुदेश पांचाळ, श्रुती संतोष भिसे, शुभम दीपक घाग, दिशा तुकाराम उंडे, दितेश दीपक भिसे, मृणाल रवींद्र लाड, आर्या सुनील सरफरे आणि स्वरा अमोल प्रभावळकर या १० विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुणांसह यश मिळवले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सौ. एस. बी. चिंचवलकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तर श्री. काजरेकर आणि श्री. सूरज जाधव यांचेही विशेष सहकार्य या विद्यार्थ्यांना लाभले. शिक्षकांच्या चिकाटीमुळे आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश साध्य झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आंगवली विकास मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या या यशाचे पालकांकडूनही सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात अशा स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन मुख्याध्यापक चव्हाण यांनी यावेळी केले. या निकालामुळे आंगवली परिसराच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर पडली आहे.





