GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : ‘खल्वायन’ 316 वी मासिक संगीत सभा मधुवंती देव यांच्या शास्त्रशुद्ध गायनाने रंगली

रत्नागिरी: खल्वायन रत्नागिरी या संस्थेची 316 वी मासिक संगीत सभा मधुवंती देव यांच्या शास्त्रशुद्ध गायनाने रसिकांना रंगवून गेली.

सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात झालेली ही संगीत सभा फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अनिता आगाशे यांनी प्रायोजित केली होती.

कै. अँड. प्रसाद महाजनी स्मृती आणि कै. श्रीधर (बंडा) आगाशे स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या झालेल्या या संगीत सभेत किराणा ग्वाल्हेर तसेच जयपूर अत्रौली घराणे गायकीच्या प्रसिद्ध गायिका व गुरू मधुवंती देव (पुणे) यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भक्तीगीते सादर केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला फिनोलेक्स कंपनीचे अधिकारी चिवटे, चिटणीस, गौरव महाजनी आणि अनिता आगाशे यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. मैफलीची सुरवात मधुवंती देव यांनी सूरमल्हार रागातील विलंबित तीनतालात निबद्ध असलेल्या ‘गरजत आये बादरिया’ या बडा ख्यालाने केली. याला जोडून मध्यलय तीनतालमधील ‘बरखा रितु बैरी हमारे’ ही बंदिश त्यांनी सादर केली. रागाची आटोपशीर मांडणी, शांत, संयमी स्वरांचा उत्तम लगाव आणि घराणेदार गायकीच्या शास्त्रशुद्ध आलाप, ताना यामुळे सुरवातीलाच मैफिलीत त्यांनी रंग भरला. त्यानंतर बागेश्री रागातील रूपक तालातील ‘अब घर आजा’ नंतर खमाज मधील ठुमरी ‘कोयलियाँ कुक सुनावे’ व शेवटी भैरवीतील ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगाने त्यांनी मैफलीची सांगता केली.

मैफलीस हार्मोनियमची साथ चैतन्य पटवर्धन व तबल्याची साथ प्रथमेश शहाणे यांनी उठावदार करून कार्यक्रमात रंगत आणली. तानपुरा व स्वरसाथ मधुवंतीताईंच्या शिष्या तेजस्विनी प्रभुदेसाई व देवयानी केसरकर यांनी केली.

Total Visitor Counter

2475143
Share This Article