GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर तालुक्यात 80 टक्के महिलांचे हिमोग्लोबिन कमी; स्वयंपूर्तता फाउंडेशनचा सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष

Gramin Varta
90 Views

तालुक्यातील 50 हजार विद्यार्थी आणि ग्रामस्थांची तपासणी

सागर मुळ्ये / देवरुख : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत व फास्ट फूड संस्कृतीमुळे अनेक आजार वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वयंपूर्तता फाउंडेशनच्या वतीने संगमेश्वर तालुक्यात 50 हजार विद्यार्थी आणि ग्रामस्थांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. यात 70 टक्के पुरुष आणि तब्बल 80 टक्के महिलांचे हिमोग्लोबिन कमी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले, अशी माहिती फाउंडेशनच्या ऑफिसर दीपिका रांबाडे यांनी दिली.

गुजरात येथील श्रीमद रामचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि स्वयंपूर्तता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही ॲनिमिया तपासणी मोहीम राबविण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेनुसार देशातील 70 टक्के जनता ॲनिमियाग्रस्त असल्याचे नमूद केले गेले असून, यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी या संस्थेने प्रत्यक्ष तळागाळातील तपासणी सुरू केली आहे.

तालुक्यातील स्वयंपूर्तता फाउंडेशनने प्रशिक्षण पूर्ण करून रत्नागिरी जिल्ह्यातील हिमोग्लोबिन तपासणी आणि औषधोपचाराची जबाबदारी स्वीकारली. पहिल्या टप्प्यात संगमेश्वर तालुक्यातील शाळा, महाविद्यालये आणि ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली.

तीन महिन्यांत तपासलेले आकडे :

◼️पुरुष तपासणी : 24,735

◼️हिमोग्लोबिन कमी असलेले : 17,314


महिला तपासणी : 25,165

◼️हिमोग्लोबिन कमी असलेल्या : 20,132

या तपासणीतून स्पष्ट झाले की महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पुरुषांपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे. फाउंडेशनने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या सर्वांना तीन महिन्यांचा औषध पुरवठा देखील केला आहे.

पुढील टप्प्यात पुन्हा एकदा त्याच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुनर्तपासणी करून औषधोपचाराचा परिणाम तपासला जाणार आहे. “या मोहिमेच्या पुढील टप्प्यात निश्चितच हिमोग्लोबिन वाढलेले दिसून येईल,” असा विश्वास दीपिका रांबाडे यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनीदेखील या आकडेवारीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. श्रीमद रामचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने रत्नागिरी जिल्हा ॲनिमिया मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, आजची तरुण पिढी सशक्त राहिल्यास पुढील पिढीही निरोगी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या मोहिमेत फाउंडेशनचे सचिव युयुस्तु आर्ते, प्रोजेक्ट ऑफिसर स्वस्तिक रांबाडे, तसेच कर्मचारी वर्ग मेहनत घेत आहेत.

Total Visitor Counter

3199628
Share This Article