GRAMIN SEARCH BANNER

आरवली रोड रेल्वे स्थानकात सांडपाण्यामुळे पाय घसरून महिला गंभीर जखमी

कोकण रेल्वेच्या हलगर्जीपणाचा ग्रामस्थांकडून निषेध; भरपाई देण्याची मागणी

संगमेश्वर : कोकण रेल्वेच्या आरवली रोड स्थानकातील अस्वच्छतेचा प्रश्न आता प्रवाशांच्या जिवावर बेतू लागला आहे. प्लॅटफॉर्मवर साचलेल्या सांडपाण्यावरून पाय घसरून पडल्याने खेरशेत येथील संयुक्ता संजय जडार या महिलेचा पाय फ्रॅक्चर झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर अपघातामुळे संगमेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी स्थानक प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला असून पीडित महिलेला तातडीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.

आरवली रोड स्थानकातील स्वच्छतागृहाची व्यवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या ठिकाणी शोषखड्डा नसल्याने मलमूत्र उघड्यावर सोडले जात आहे. गेल्या वर्षभरापासून प्रवाशांना येथील दुर्गंधी आणि डासांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून स्वच्छतागृहाची पाइपलाइन पूर्णपणे तुंबल्याने घाणीचे पाणी थेट प्लॅटफॉर्मवर वाहत आहे. याच सांडपाण्यावरून चालताना संयुक्ता जडार यांचा पाय घसरला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सुरेश भायजे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर धनावडे, दत्ताराम लांबे, मुरुडवचे माजी सरपंच मुकेश चव्हाण, पोलीस पाटील राजेंद्र मेणे, दशरथ पवार, सुनील भुवड, विजय चव्हाण, अमोल बाटे, रामदास गर्दे आणि अमित काताळे यांनी प्रत्यक्ष स्थानकावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्वच्छतागृहातून किड्यांनी भरलेले दूषित पाणी प्लॅटफॉर्मवर वाहत असल्याचे भीषण वास्तव समोर आले. रेल्वे प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Total Visitor Counter

3471924
Share This Article