GRAMIN SEARCH BANNER

परतीच्या पावसाने भात कापणी उद्ध्वस्त

Gramin Varta
104 Views

रत्नागिरी: जिल्ह्यासह कोकणात सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असतानाच परतीच्या पावसाने बळीराजाचे हाल केले आहेत. दिवसा प्रखर उष्णता आणि संध्याकाळी अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग पूर्णतः चिंतेत सापडला आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेण्याची भीती निर्माण झाली आहे.

भाताच्या लोंब्यांत दाणा तयार झाला असून, काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे कापणी केलेले धान भिजून चिखलात बसले आहे. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. काही ठिकाणी शेतातील पिके पूर्णपणे झोपली आहेत, तर कोठे कोठे ठेवलेले भाताचे भारे पुन्हा ओले झाले आहेत.

भात कापणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संकट आणखी वाढले आहे. परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. दिवाळीचा आनंद साजरा करण्याऐवजी बळीराजा पावसाच्या विश्रांतीची वाट पाहत शेतातच धावपळ करताना दिसतो आहे.

या वर्षी ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही शेतकऱ्यांनी धैर्याने खरिप हंगामासाठी पुन्हा पेरणी केली होती. मात्र आता परतीच्या पावसाने उरलेसुरले पीकही उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रायगड आणि परिसरात सध्या “पावसात भिजलेले शेत, चिंतेत बुडालेले शेतकरी” असे वास्तव दिसत आहे. बळीराजाची दिवाळी पुन्हा एकदा शेतातच अडकली असून, प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.

Total Visitor Counter

2680482
Share This Article