GRAMIN SEARCH BANNER

अणुस्कुरा घाटात भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Gramin Varta
999 Views

पाचल/ अंकुश पोटले: अणुस्कुरा घाटात आज सायंकाळी 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास अत्यंत भीषण दुचाकी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. निलेश विलास पाटील असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून, अपघातग्रस्त तिघेही बांबवडे येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बांबवडे परिसरासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या अपघातानंतर प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ कारभार आणि आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. अपघात होऊन तब्बल एक ते दीड तास उलटून गेले, तरीही घटनास्थळी शासकीय रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीने रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला, मात्र गाडीत डिझेल नाही आणि डॉक्टर उपलब्ध नाहीत अशी धक्कादायक कारणे प्रशासनाकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या असंवेदनशील आणि निष्काळजीपणामुळे गंभीर जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळण्यात मोठे अडथळे निर्माण झाले आणि यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे घटनास्थळावरील स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. अपघात घडल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. रुग्णवाहिका न आल्याने स्थानिकांनी स्वतः पुढाकार घेत जखमींना तातडीने इतर वाहनांद्वारे मदत पोहचवण्यासाठी धावपळ केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोग्य यंत्रणेच्या अशा हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गंभीर जखमींना तात्काळ योग्य ते वैद्यकीय उपचार मिळावेत आणि आपत्कालीन सेवेत कसूर करणाऱ्या जबाबदार प्रशासकीय घटकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

Total Visitor Counter

3425481
Share This Article