GRAMIN SEARCH BANNER

पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते
श्री क्षेत्र टेरव देवस्थान दिनदर्शिकेचे प्रकाशन

Gramin Varta
6 Views

चिपळूण : श्री क्षेत्र टेरव, श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई देवस्थानाची २०२६ सालची दिनदर्शिका प्रकाशन व लोकार्पण सोहळा कोकणातील चिपळूणच्या सुकन्या, पद्मभूषण पुरस्कारप्राप्त तसेच आठ वेळा इंदूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या शुभहस्ते दादर, मुंबई येथे दिमाखात संपन्न झाला.

ब्राह्मण सेवा मंडळातर्फे सुमित्राताई महाजन यांना नुकताच ब्रह्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित या विशेष सोहळ्यास सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार व गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व समाजवादी नेते कै. प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या सुकन्या आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या पहिल्या महिला अध्यक्षा मीनलताई मोहाडीकर हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुमित्राताईंना श्री सिद्धिविनायक मंदिराचे महावस्त्र व प्रसाद भेट देण्यात आला. चिपळूणच्या माहेरवाशिणी असलेल्या सुमित्राताई महाजन यांनी पर्यावरणप्रेमी म्हणून तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित ‘मातोश्री’ हे पुस्तक लिहून साहित्य क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. इंदूर शहराला सलग अनेक वर्षे देशातील स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांच्या नियोजनबद्ध व कल्पक नेतृत्वाचा मोठा वाटा राहिला आहे. या प्रसंगी त्यांना श्री क्षेत्र टेरव देवस्थानास भेट देण्याचे निमंत्रणही देण्यात आले.

गेली १६ वर्षे देवस्थानच्या वतीने भाविक व ग्रामस्थांना आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण अशी दिनदर्शिका भेट दिली जात असून यावर्षीही या दिनदर्शिकेला मोठी मागणी आहे. टेरव गावातील ग्रामस्थांसह मुंबई, पुणे, ठाणे, सुरत, बडोदा, वापी आदी शहरांतील टेरववासीय, माहेरवाशिणी, भाविक, सगे-सोयरे, शुभचिंतक व देणगीदारांना ही दिनदर्शिका वितरित करण्यात येणार आहे.

देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची सविस्तर माहिती या दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली असून भाविकांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे.

Total Visitor Counter

3084900
Share This Article