GRAMIN SEARCH BANNER

साडवली येथे असलेला बिबट्या अखेर वनविभागाकडून जेरबंद

Gramin Varta
473 Views

संगमेश्वर: आज सकाळी  संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी गावात एक बिबट्या अडकल्याने एकच खळबळ उडाली. गावातील रहिवासी राजेंद्र धने यांच्या घरामागे हा बिबट्या अडकला होता. पोलीस पाटलांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याची सुखरूप सुटका केली.

सकाळी ९.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बिबट्या एकाच जागी शांत बसलेला असल्याने त्याला पकडणे थोडे सोपे झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. नंतर वन्यजीव पशुवैद्यक युवराज शेटे आणि संतोष वाळवेकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय साधारण ३ ते ४ वर्षे आहे. त्याच्या डाव्या मागील पायाच्या मांडीला जखम झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे त्याला चालता येत नव्हते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर त्वरित उपचार केले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वनविभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी श्री प्रकाश सुतार आणि श्री जितेंद्र गुजले, वनपाल श्री सागर गोसावी, सारिक फकीर, तसेच वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, सुप्रिया काळे, सूरज तेली, नमिता कांबळे, श्रावणी पवार, विशाल पाटील, दत्तात्रय सुर्वे आणि रणजीत पाटील यांचा समावेश होता. साडवलीचे पोलीस पाटील आणि गावातील इतर ग्रामस्थही यावेळी मदतीला उपस्थित होते.

या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांनी केले. वनविभागाने या घटनेनंतर लोकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास किंवा एखादा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधावा. यामुळे वन्यप्राण्यांचे जीवन वाचवता येते आणि संभाव्य दुर्घटना टाळता येतात.

Total Visitor Counter

2647380
Share This Article