GRAMIN SEARCH BANNER

राज्यात सलग तीन महिने आचारसंहितेची शक्यता!

Gramin Varta
282 Views

मुंबई: राज्यातील नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुकींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नगराध्यक्ष व प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असून मतदार यादीही पूर्ण झाली आहे.

त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मंगळवार किंवा बुधवारी होण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेतच निवडणुकीच्या कार्यक्रमासह आचारसंहितेची घोषणा होईल, असे सूत्रांनी सांगितले.

राज्यात २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महापालिकांची निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पार पाडणे बंधनकारक आहे. त्यानुसार आयोगाने आराखडा तयार केला असून निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याची शक्यता आहे.पहिल्या टप्प्यात २८९ नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, तर तिसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. नगरपालिका निवडणुकीचा कालावधी २१ दिवसांचा, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांचा ३० ते ३५ दिवसांचा आणि महापालिकांचा २५ ते ३० दिवसांचा असेल, अशी माहिती मिळाली आहे.

आचारसंहिता ५ नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता असून निवडणूक प्रक्रिया सुमारे ८५ दिवस चालेल. सुट्ट्यांचा विचार करता हा कालावधी सुमारे तीन महिने वाढू शकतो. त्यामुळे राज्यात सलग तीन महिने आचारसंहिता लागू राहण्याची शक्यता आहे. या काळात विकासकामांवर आणि नवीन शासकीय निर्णयांवर बंधन येणार असून प्रशासनासह राजकीय पक्षांनी सज्ज राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3367692
Share This Article