GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात ऑनलाईन पाणीबिलाच्या नावाखाली बनावट ॲपद्वारे नागरिकांची फसवणूक

Gramin Varta
155 Views

चिपळूण : चिपळूणसह लोटे औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ऑनलाईन पाणीबिल भरणा सुविधेचा गैरवापर करून सायबर चोरट्यांनी उद्योगधंदे व ग्राहकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पाणीपुरवठा बंद होणार असल्याचे बनावट संदेश पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचा नवा प्रकार उघडकीस आला असून, यात काही जणांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे.

एमआयडीसीच्या निदर्शनास या तक्रारी आल्यानंतर महामंडळाने तातडीने सावधगिरीचा इशारा देत अधिकृत संकेतस्थळाशिवाय कोणत्याही ॲप, लिंक किंवा क्यूआर कोडवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन केले आहे.

गेल्या महिन्यापासून सायबर चोरटे एमआयडीसीच्या नावाने नागरिकांना ‘पाणीपुरवठा बंद होणार आहे’ असा बनावट मेसेज पाठवत आहेत. मागील महिन्याचे पाणीबिल थकित असल्याचे भासवून हे संदेश व्हॉट्सॲपवर पाठवले जात आहेत. हा संदेश मिळाल्यानंतर अनेक नागरिक भीतीपोटी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधतात. त्यानंतर सायबर गुन्हेगार प्रलंबित पाणीपट्टी भरण्यास सांगतात आणि व्हॉट्सॲपवर एक ‘फाईल’ पाठवतात.

ही फाईल डाउनलोड करताच मोबाईलमध्ये व्हायरस प्रवेश करतो आणि त्यातून सर्व माहिती हॅक केली जाते. बँक खात्याच्या संवेदनशील माहितीसह डेबिट-क्रेडिट कार्डचा तपशील चोरला जातो. काही वेळातच नागरिकांच्या खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम परस्पर काढण्यात येते किंवा ऑनलाईन वळवली जाते. या प्रकारात काही उद्योजकांची फसवणूक झाल्यानंतर संबंधित उद्योजक संघटनांनी एमआयडीसीकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर चिपळूण येथील एमआयडीसी कार्यालयाने चिपळूण पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे की पाणीबिल भरण्याची अधिकृत ऑनलाईन सुविधा केवळ त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि अधिकृत क्यूआर कोडही त्याच पोर्टलवर देण्यात आलेला आहे.

मात्र या सेवेची नक्कल करून काही भामट्यांनी बनावट नावाचे ॲप तयार करून ते व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे पाठवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या बनावट लिंकवर क्लिक केल्यास ग्राहकांची वैयक्तिक माहिती, बँक तपशील तसेच डेबिट व क्रेडिट कार्डची माहिती चोरी होण्याचा मोठा धोका आहे.

या प्रकरणी संबंधित बनावट ॲप्स व लिंकची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली असून, ग्राहकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद संदेशास प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3225016
Share This Article