GRAMIN SEARCH BANNER

गुगलवर ट्रॅव्हल कंपनी शोधणे पडले महागात; १४९ रुपयांच्या रजिस्ट्रेशन नावाने रत्नागिरीतील नोकरदाराला अडीच लाखांचा गंडा

Gramin Varta
155 Views

रत्नागिरी: गुगलवर खाजगी वाहनाचा शोध घेत असताना एका अज्ञात सायबर भामट्याने रत्नागिरीतील ५५ वर्षीय नोकरदाराला तब्बल २ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. १४९ रुपयांचे रजिस्ट्रेशन शुल्क भरण्याच्या बहाण्याने क्रेडिट कार्डची माहिती चोरून ही ऑनलाईन फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक मनमोहन सोन्स (वय ५५, रा. मेहुल सिनेमाजवळ, मुलुंड पश्चिम, मुंबई) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवेक सोन्स यांना फिनोलेक्स गेस्ट हाऊस झाडगाव ते फिनोलेक्स कंपनी गोळप अशी रोजची ये-जा करण्यासाठी एका खाजगी गाडीची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी मोबाईलवर गुगल सर्च करून ‘ट्रॅव्हलर अँड सेल्फ ड्राईव्ह लक्ष्मी रत्नागिरी’ असा शोध घेतला आणि तिथे मिळालेल्या क्रमांकावर संपर्क साधला. समोरील अज्ञात व्यक्तीने सोन्स यांना व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून गाडी बुक करण्यासाठी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे अवघे १४९ रुपये रजिस्ट्रेशन फी भरण्यास सांगितले. सोन्स यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपल्या क्रेडिट कार्डचा सोळा अंकी नंबर आणि सीव्हीव्ही क्रमांक टाकून १४९ रुपये भरण्याचा पर्याय निवडला.

मात्र, १३ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर ‘ॲपल इंडिया’ ट्रान्झॅक्शनसाठी २ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा मेसेज आणि ओटीपी आला. इतकी मोठी रक्कम वजा होत असल्याचे पाहून सोन्स यांनी तो ओटीपी न टाकता व्यवहार रद्द करून लिंक बंद केली. परंतु, काही सेकंदातच त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला आणि ‘हा व्यवहार रद्द करायचा असेल तर ९ दाबा’ असे सांगण्यात आले. सोन्स यांनी फोनवर ९ हा अंक दाबला, आणि त्याच क्षणी त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून २ लाख ५१ हजार ८०० रुपये ॲपल इंडियाच्या खात्यावर वर्ग झाल्याचा मेसेज आला. अवघ्या १४९ रुपयांच्या नावाने अज्ञात भामट्याने बनावट लिंक पाठवून बँक खात्यातून मोठी रक्कम लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर सोन्स यांनी पोलिसांत धाव घेतली. पूर्णगड पोलिसांनी २१ मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१८(४), ३१९(१)(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६(क) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस सायबर सेलच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3485535
Share This Article