मुंबई : पटसंख्येच्या आधारे संचमान्यता करण्याचा शासन निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर आता राज्यातील जवळपास १८ हजार माध्यमिक इयत्तांचे वर्ग बिनशिक्षकी होण्याची शक्यता आहे. संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार इयत्ता ९ वी व १० वीच्या वर्गासाठी किमान २० विद्यार्थ्यांची अट ठेवण्यात आली असून, राज्यातील जवळपास १८ हजार शाळांमध्ये या वर्गांमधील विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे.
शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार ५ डिसेंबरपर्यंत शिक्षक समायोजन प्रक्रिया राबविल्यास ऐन परीक्षांच्या कालावधीत या १८ हजार शाळांमधील इयत्ता ९ व १० वीच्या वर्गातील शिक्षकांची संख्या शून्य होणार आहे. परिणामी, दहावीच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. वास्तविक इयत्ता ९ वी १० वीला समाजशास्त्रासाठी एक, भाषांसाठी एक व गणित व विज्ञान या विषयांसाठी एक असे तीन शिक्षक दिले जात होते. मात्र नव्या शासन निर्णयानुसार इयत्ता ९ वी व १० वीच्या प्रत्येक वर्गात २० विद्यार्थी असल्यास एक शिक्षक देण्याची तरतूद केली आहे. त्यामुळे नव्याने करण्यात येणाऱ्या संचमान्यतेनुसार राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.
अतिरिक्त शिक्षकांचे ५ डिसेंबरपर्यंत जिल्हास्तरावर समायोजन करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानंतर विभाग स्तरावर आणि २० डिसेंबरपर्यंत राज्य स्तरावर समायोजन करण्यात येणार आहे. या समायोजन प्रक्रियेमुळे राज्यातील जवळपास १८ हजार शाळांमध्ये शिक्षक संख्या शून्य होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा न्यायालयीन निर्णय असल्याने शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिक्रियेस नकार दिला आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा कशा घेणार?
दहावीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उजळणीच्या कालावधीतच शिक्षक नसल्यास विद्यार्थ्यांना शिकविणार कोण? त्यांचा अभ्यासक्रम कसा पूर्ण होणार? त्यांच्या तोंडी व विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबवून मराठी माध्यमाच्या शाळांसह अन्य भाषिक शाळा बंद पाडण्याचा घाट शिक्षण विभागाकडून घालण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना तीन विषय शिक्षक देण्यात यावेत. अनिल बोरनारे, मुंबई मुख्याध्यापक संघटना, उत्तर विभाग अध्यक्ष
नववी, दहावीचे विद्यार्थी शिक्षकांविना?, पटसंख्येच्या आधारे समायोजन, राज्यातील १८ हजार शाळांना फटका








