GRAMIN SEARCH BANNER

महाड निवडणुकीत भानामतीचा संशय; निवडणूक कायद्यानुसार गंभीर गुन्हा

Gramin Varta
80 Views

महाड : नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदारांवर म्हणे “अलौकिक प्रभाव” टाकण्यासाठी काही ठिकाणी भानामतीसदृश वस्तू पाडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून, या प्रकाराने निवडणुकीच्या स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या प्रकरणाची कायदेशीर बाजू अधिक गंभीर असून लोकप्रतिनिधी अधिनियम आणि भारतीय दंड संहितेनुसार संबंधितांवर गुन्हे नोंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निवडणूक प्रक्रियेत मतदारांना कोणत्याही प्रकारे भ्रमित करणे, भय-भीती निर्माण करणे किंवा त्यांच्या धार्मिक-सामाजिक श्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांचा मतदानाचा कल बदलण्याचा प्रयत्न करणे हे Representation of the People Act 1951 च्या विविध कलमांनुसार “भ्रष्ट आचरण” मानले जाते. विशेषतः कलम 123(1) – Bribery आणि 123(2) – Undue Influence हे कलम अशा प्रकारांना थेट लागू होते. भानामतीचा आव आणून वस्तू पाडणे, पूजासाहित्य किंवा धार्मिक वस्तूंचे वितरण करून मतदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न – हे स्पष्टपणे अनुचित प्रभावाच्या श्रेणीत मोडते.

तसेच, भारतीय दंड संहितेतील IPC 417 (फसवणूक) आणि IPC 508/506 (भीती निर्माण करणे/धाक-दपटशा) याअंतर्गतही गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. व्हिडिओमध्ये दाखवलेले कृत्य सार्वजनिक शांतता बिघडवणारे किंवा अंधश्रद्धा भडकवणारे असल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ चादेखील संभाव्य अवलंब करता येऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेनुसार मतदारांना कोणतेही वस्तू-प्रलोभन, धार्मिक प्रतीकांचे वितरण किंवा दिशाभूल करणारे कृत्य कडकपणे निषिद्ध आहे. दोषी उमेदवाराची निवडणूक रद्द होणे, सहा वर्षांपर्यंत निवडणुकीत अपात्रता आणि गुन्हेगारी शिक्षा – असे गंभीर परिणाम यातून उद्भवू शकतात.

या प्रकारामुळे प्रशासनावर तातडीने कारवाईची मागणी वाढली असून, महाडमधील निवडणूक वातावरण अधिक संवेदनशील बनले आहे. निवडणूक आयोगाची चौकशी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3072889
Share This Article