रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथे विहिरीच्या पाण्याच्या वापरावरून झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली असून एका वृद्धाला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार २ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या घराच्या अंगणात घडला असून सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन यशवंत खानविलकर (वय ६८) हे आपल्या पत्नी सुवर्णा यांच्यासह सामाईक विहिरीचे पाणी घराच्या बांधकामासाठी वापरत होते. यावेळी आरोपी रविंद्र यशवंत खानविलकर (वय ५६) यांनी “ही तुझी विहीर आहे का?” असे म्हणत पाणी वापरण्यास विरोध केला आणि त्यातून दोघांत वाद झाला. वादाच्या भरात आरोपीने शिवीगाळ करत लोखंडी सळीने मोहन खानविलकर यांच्या डोक्यात मारहाण केली.
या हल्ल्यात मोहन खानविलकर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





