GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उभ्या ट्रकला कारची धडक; महिलेस गंभीर दुखापत

Gramin Varta
5 Views

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात १ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर बॉक्साईट भरलेला टाटा १६ टायर ट्रक (क्रमांक केए/२२/डी/६८३१) अचानक बंद पडल्याने चालक विष्णु शेटप्पा लमाणी (वय ३६, रा. चैन्नापुर, जि. बेळगाव, कर्नाटक) याने तो ट्रक रस्त्याच्या दुभाजकाजवळ उभा करून ठेवला होता. मात्र, हा महामार्ग अतिशय वर्दळीचा असूनही मागून येणाऱ्या वाहनांना ट्रक बंद असल्याची कल्पना यावी यासाठी कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेली नव्हती.

दरम्यान, त्याच मार्गावरून मुंबईहून गोव्याकडे जात असलेली टाटा नेक्सॉन (क्रमांक एमएच/०१/ईजे/९६४५) ही कार चालक ओंकार विकास राणे (वय ३५, रा. बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) चालवत होता. अंधारामुळे आणि ट्रक उभा असल्याची कल्पना न आल्याने कारने थेट ट्रकच्या मागील डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील प्रवासी चित्रा संतोष आचरेकर (रा. आंबोळगड, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांना डोक्याला व बरगडीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १२५ (अ), १२५ (ब) व २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3351775
Share This Article