रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सायबर चोरट्यांनी आपला मोर्चा गॅस ग्राहकांकडे वळवला असून, फसवणुकीची एक नवीन पद्धत समोर आली आहे. ‘महानगर गॅस’ कंपनीतून बोलत असल्याचे सांगून ग्राहकांना गॅस कनेक्शन कापण्याची भीती घातली जात आहे आणि त्याद्वारे मोबाईल हॅक करून बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे.
रत्नागिरीत नुकतीच एका व्यक्तीची ६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे.सायबर चोरटे ग्राहकांना फोन करतात आणि आपण महानगर गॅस कंपनीचे प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवतात. ‘तुमचे गॅस बिल अपडेट नाही, त्यामुळे आजच तुमचे कनेक्शन कापले जाईल,’ अशी भीती ग्राहकाला घातली जाते. सध्या गॅस टंचाईची परिस्थिती असल्याने नागरिकही घाबरतात आणि चोरट्यांच्या जाळ्यात अडकतात.चोरटे समोरच्या व्यक्तीला सांगतात की, ‘तुम्ही आताच फक्त ७ रुपये भरा, म्हणजे तुमचे कनेक्शन सुरू राहील.’ त्यानंतर ते व्हॉट्सअॅपवर एक ‘APK’ (एपिके) फाईल पाठवतात.
भामट्यांनी पाठवलेली ही एपिके फाईल डाऊनलोड करताच ग्राहकाच्या मोबाईलचे संपूर्ण नियंत्रण चोरट्यांकडे जाते. या फाईलच्या माध्यमातून चोरटे तुमच्या फोनमधील मेसेज, ओटीपी आणि बँक डिटेल्स सहज पाहू शकतात. अवघ्या काही मिनिटांतच तुमच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले जातात.
अशा प्रकारचे सायबर गुन्हे सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घडल्याचे सातारा पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आता हे लोन रत्नागिरी जिल्ह्यातही पसरले आहे. आज रत्नागिरीतील एका नागरिकाला अशाच फोन कॉलमुळे ६ हजार रुपये गमवावे लागले आहेत.
रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत यामध्ये कोणतीही गॅस कंपनी फोनवर अशा प्रकारे पैसे भरण्यास सांगत नाही. अनोळखी व्यक्तीने पाठवलेली कोणतीही apk फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नका.
कमी पैशांचे आमिष दाखवून बँक डिटेल्स मागितल्यास सावधान राहा. मोबाईल हॅक झाल्याचा संशय आल्यास त्वरित इंटरनेट बंद करा आणि सायबर पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे.







