GRAMIN SEARCH BANNER

शिमगोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी

Gramin Varta
234 Views

खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथील घटना

खेड:- शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांच्या खासगी आराम बसला भीषण अपघात झाल्याची घटना खेड तालुक्यात घडली. खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे बोरिवलीहून सापिर्ली गावाकडे येणारी बस पलटी झाल्याने २५ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातातील सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली येथून सापिर्ली व धामणंद परिसरातील भाविक शिमगोत्सव आणि ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या गावी येत होते. नेहमीप्रमाणे ही खासगी आराम बस गुरुवारी रात्री बोरिवलीहून निघाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास बस खेड-धामणंद मार्गावरील एनवरे येथे पोहोचली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली.या बसमध्ये एकूण २८ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर काही प्रवासी बसमध्ये अडकून पडले होते. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तसेच त्या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. बसची समोरील काच फोडून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्या कोकणात शिमगोत्सवाची धूम असून ग्रामदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी घरोघरी जात आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी आणि भाविक आपल्या गावी येत असतात. त्याचदरम्यान हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Total Visitor Counter

3156186
Share This Article