GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत आरोग्य सेविकेला मारहाण; आरोपीला तात्काळ अटक न केल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

Gramin Varta
1.1k Views

दापोली: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई अंतर्गत येणाऱ्या खेर्डी उपकेंद्रातील आरोग्य सेविका जयश्री टिळे यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणाने संपूर्ण आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेप्रकरणी पोलिसांत रीतसर एफआयआर दाखल करण्यात आला असून, संबधित आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने लावून धरली आहे. आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे होणारे हल्ले अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांनी म्हटले आहे.

प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असला तरी, आरोपीला त्वरित बेड्या न ठोकल्यास संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी काम बंद आंदोलन छेडतील, असा इशाराही डॉ. निवेंडकर यांनी दिला आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

3198488
Share This Article