GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड: महिलांचे दागिने लांबवणारा सराईत चोरटा जेरबंद; बंदिस्त युवतीची सुटका करण्यात पोलिसांना यश

Gramin Varta
158 Views

मंडणगड प्रतिनिधी: महिला बचत गटातील महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे सुमारे पावणे तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात मंडणगड पोलिसांना यश आले आहे. चंद्रकांत तेरवणकर (रा. आंबेळे, ता. चिपळूण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या तावडीतून पोलिसांनी एका बंदिस्त करून ठेवलेल्या युवतीची सुटका केली आहे. ९ मार्च रोजी दाभट परिसरात महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेतील समिधा येरवणकर, साक्षी सोंडकर, जागृती तांबुटकर, तेजस्वी सुतार, सानिका गायकवाड आणि सायली यादव या सहा महिलांनी विश्वासाने दिलेले २ लाख ७१ हजार १०० रुपयांचे दागिने घेऊन तेरवणकर पसार झाला होता.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी पुणे, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर आणि धुळे असा सुमारे अडीच हजार किलोमीटरचा थरारक प्रवास अवघ्या पाच दिवसांत पूर्ण केला. तपासादरम्यान आरोपी अत्यंत सराईतपणे वारंवार सिमकार्ड आणि ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र तांत्रिक माहिती आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी पुणे ग्रामीण भागात सापळा रचून शुक्रवारी रात्री त्याला मुद्देमालासह नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या. चोरीच्या दागिन्यांसह पळ काढणाऱ्या या आरोपीला जेरबंद करून पीडित युवतीला सुरक्षित परत आणल्याबद्दल मंडणगड पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3369376
Share This Article