फणसवळे वासियांचा एल्गार
रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीकच्या फणसवळे गावासाठी मजगाव मार्गे सायंकाळी 6 वाजताची एसटी बस सेवा पूर्वी सुरू होती. मात्र ती अचानक बंद करण्यात आल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ही सेवा पुन्हा सुरू न झाल्यास येत्या 1 ऑगस्टपासून रत्नागिरी एसटी स्थानकात उपोषण करणार असल्याचा इशारा फणसवळे ग्रामस्थांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी फणसवळे गावातील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी यांनी रत्नागिरीतील एसटी प्रशासनाच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले. सरपंच निलेश लोंढे, संतोष आंबेकर, मुकेश माने, रामचंद्र आंबेकर, गौरव नाखरेकर आदींसह शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडली. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अनेक विद्यार्थी रत्नागिरी शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. मात्र सायंकाळी गावाकडे परतण्यासाठी पूर्वीची 6 वाजताची बस बंद झाल्याने त्यांना तासन्तास वाट पाहावी लागते.
या बससेवेच्या अभावामुळे विद्यार्थी रात्री उशिरा घरी पोहोचतात. परिणामी दुसऱ्या दिवशीचा अभ्यास, खेळ आणि पुरेशी झोप या बाबतीत त्यांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते. हे सर्व लक्षात घेता, सदर सेवा तत्काळ पूर्ववत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याआधीही प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली गेली असून प्रत्यक्ष चर्चाही झाली. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनांपलीकडे काहीच घडले नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटत चालला आहे. याशिवाय, फणसवळेसाठी सुटणाऱ्या बसचा प्लॅटफॉर्म चुकीच्या ठिकाणी दर्शवणारा फलक लावण्यात आला असून, तो योग्य ठिकाणी हलवण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
जर 1 ऑगस्टपर्यंत ही बससेवा सुरू झाली नाही, तर फणसवळे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ रत्नागिरी एसटी स्थानकात ठिय्या आंदोलन करतील, असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या महत्त्वाच्या मागणीची गंभीर दखल घेण्याचे आवाहन प्रशासनाला करण्यात आले आहे.