लाखो भाविकांनी घेतले जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांचे आशीर्वाद
नाणीज:चिपळूण तालुक्यातील नाणीज येथील सुंदरगडावर आज गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ती आणि शक्तीचा मळा फुलल्याचे दिव्य दृश्य पाहायला मिळाले. कोसळणाऱ्या पावसाच्या साक्षीने आणि लाखो भाविकांच्या सान्निध्यात चैतन्यदायी वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
सकाळी पहाटेपासूनच सुंदरगड परिसर उजळून निघाला होता. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा, छत्तीसगड आदी राज्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी गुरुपौर्णिमेच्या पूजनासाठी गर्दी केली होती. कार्यक्रम सकाळी ८.३० वाजता सुरू झाला असला तरी भाविक सकाळी ६ पासूनच जागा घेऊन पूजनाच्या तयारीला लागले होते.
भाविकांनी आपल्या कुटुंबासह, मित्रमंडळींसह पूजेसाठी आवश्यक असलेले साहित्य आणले होते. प्रत्येकाच्या हातात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांची प्रतिमा होती. सोहळ्याची सुरुवात जगद्गुरूंच्या सुंदरगड आगमनाने झाली. त्यावेळी जयघोषांनी गड दुमदुमून गेला. त्यांनी प्रथम संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले, त्यानंतर संतपीठ येथे सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले. त्यावेळी टाळ, घंटा आणि जयजयकाराने वातावरण भक्तिमय झाले.
संपूर्ण गडावर एकत्रित पूजाविधी
संतपीठावरून वे.शा.सं. भालचंद्रशास्त्री शौचे गुरुजींनी पूजाविधी मार्गदर्शित केला. सर्व भाविक एकाच वेळी पूजन, फुले वाहणे, निरांजन प्रज्वलित करणे, औक्षण, घंटानाद करत होते. हे दृश्य अतिशय भारावून टाकणारे होते. एकाचवेळी लाखो लोकांचा एकत्रित मंत्रोच्चार आणि भक्तिरसांनी न्हालेला गड हे दृश्य अंगावर रोमांच उठवणारे ठरले.
शुभशीर्वाद व गुरुकृपा
सोहळ्यानंतर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी हात उंचावून सर्वांना शुभाशीर्वाद दिले. ते म्हणाले, “आजची गुरुपौर्णिमा ही सर्वांसाठी पर्वणी ठरली आहे. या गुरुकृपेने सर्वांच्या जीवनाचे सोने व्हावे हीच प्रार्थना.”
महामृत्युंजय यागाची सांगता व चरणदर्शन
काल सुरू झालेल्या सप्त चिरंजीव महामृत्युंजय यागाची सांगता आज दुपारी करण्यात आली. त्यानंतर चरणदर्शनाची सुरुवात झाली. भाविक आपल्या गुरूंचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगेत उभे होते. गुरू-शिष्य यांचा हृदयस्पर्शी सोहळा दीर्घकाळ सुरू होता.
या अध्यात्मिक महाउत्सवाला प.पू. कानिफनाथ महाराज, सौ. सुप्रियाताई, सौ. ओमेश्वरी ताई, देवयोगी व जगद्गुरूश्रींचा संपूर्ण परिवार उपस्थित होता.
नाणीजक्षेत्री गुरुपौर्णिमेनिमित्त भक्ती व शक्तीचा मळा फुलला
