GRAMIN SEARCH BANNER

धामणदिवी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचारा विरोधात माजी सदस्याचे आमरण उपोषण सुरू

खेड: तालुक्यातील धामणदिवी ग्रामपंचायतीतील विकासकामे तसेच Government e-Marketplace (GeM) खरेदी प्रक्रियेत झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि अनियमितते विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य संदेश सोनू पेवेकर यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

प्रशासनाकडून वारंवार दिली गेलेली आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी खेड पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले.

पेवेकर यांनी यापूर्वी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली होती. मात्र, दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी ३ मार्च रोजी देखील उपोषण छेडले होते. त्या वेळी प्रशासनाने लेखी आश्वासन देत आठ दिवसांत चौकशी पूर्ण करून दोषारोपांसह अहवाल जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल, असे सांगितले होते.

परंतु, या आश्वासनाला सुमारे २० दिवस उलटूनही ना अहवाल सादर करण्यात आला, ना त्याची प्रत तक्रारदाराला देण्यात आली. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याची गंभीर बाब समोर आली असून, पेवेकर यांनी आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, मूळ तक्रारीला चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. शासनाच्या नियमांनुसार एका महिन्यात कारवाई अपेक्षित असताना जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर पेवेकर यांनी ७ एप्रिल २०२६ पर्यंत चौकशी अहवाल सादर करून संबंधितांवर रक्कम वसुली, फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी अखेर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3430521
Share This Article