GRAMIN SEARCH BANNER

लांजातील काजू फॅक्टरीवर भागीदारानेच मारला डल्ला; ३ लाखांहून अधिकचा काजूगर लंपास

Gramin Varta
322 Views

लांजा : तालुक्यातील गवाणे येथील एका काजू फॅक्टरीतून सुमारे ३ लाख १२ हजार रुपये किमतीचा काजूगर चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी फॅक्टरीच्या मालकाने आपल्याच पार्टनरवर आणि त्याच्या मित्रावर चोरीचा गुन्हा दाखल केला असून परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.


याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अनिकेत शिरीष पंडित (वय ३०, रा. साडवली-देवरुख) हे गवाणे येथे ‘रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित’ ही काजू फॅक्टरी चालवतात. रविवारी, १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अनिकेत पंडित यांचे भागीदार लोकेश शेनॉय (रा. आनंद नगर, पुणे) आणि त्यांचा मित्र अर्जुन बोरकर यांनी संगनमत करून फॅक्टरीमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी फॅक्टरीतून ८०० रुपये किलो दराचा, प्रत्येकी १० किलोच्या प्लास्टिक पॅकेटमध्ये भरलेला एकूण ३९० किलो पक्का काजूगर अनिकेत यांच्या संमतीशिवाय अर्टिगा कारमध्ये (क्रमांक MH 12 LD 5121) भरून लंपास केला.


या चोरीच्या प्रकारानंतर अनिकेत पंडित यांनी तातडीने लांजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी लोकेश शेनॉय आणि अर्जुन बोरकर यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०५ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. रात्री १०:२५ वाजता हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. भरदिवसा पार्टनरनेच अशा प्रकारे मालाची पळवापळवी केल्याने काजू प्रक्रिया उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

Total Visitor Counter

3370256
Share This Article