GRAMIN SEARCH BANNER

राजापूर नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी एकवटली; ॲड. हुस्नबानू खलिफे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Gramin Varta
362 Views

तुषार पाचलकर/राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या बहुप्रतिक्षित सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, थेट नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीने माजी विधान परिषद सदस्य ॲड. हुस्नबानू खलिफे यांना उमेदवारी देऊन मोठे राजकीय पाऊल टाकले आहे. सोमवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ॲड. खलिफे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा चार पक्षांनी एकत्र येत राजापूरच्या विकासासाठी एकदिलाने ही लढत देण्याची तयारी दर्शवली आहे.

आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने, महाविकास आघाडीच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने आणि उत्साहाच्या वातावरणात पूर्ण केली.

सकाळी नऊ वाजता राजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि असंख्य निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याठिकाणी निवडणुकीच्या अंतिम रणनीतीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अर्ज भरण्यापूर्वी शक्तीप्रदर्शन करत आणि राजापूरच्या वैचारिक आणि सांस्कृतिक वारसाला वंदन करत मिरवणुकीला सुरुवात झाली.
प्रथमतः, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानंतर जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या शौर्याला आदराने वंदन करण्यात आले. धार्मिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या घायलशा बाबा दर्ग्याला फुलांच्या माळेची चादर चढवण्यात आली आणि सर्वांनी एकत्र येऊन प्रार्थना केली. या सर्व धार्मिक आणि औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवारांनी एकत्र राजापूर नगर परिषदेच्या कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार गणपतराव कदम यांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच, काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, ॲड. जमीर खलिफे, दिलीप फोडकर, देवदत्त वालावलकर, अनंत फणसे, मलिक गडकरी, रघुनाथ आडीवरेकर, संजय पवार, चंद्रप्रकाश नकाशे, काँग्रेस शहराध्यक्ष अजीम जैतापकर, सुभाष बाकाळकर, शाईबाज खलिफे, अनिल कुडाळी, संगीता चव्हाण, विनय गुरव, अभिजित तेली, रवी डोळस, सुलतान ठाकूर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. खलिफे यांच्या उमेदवारीमुळे राजापूरच्या निवडणुकीत चुरस वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Total Visitor Counter

3199521
Share This Article