राजापूर: तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुसाकाझी बंदर येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळून आला. समुद्र किनाऱ्यावर पालथ्या अवस्थेत हा मृतदेह पोलिसांना मिळून आला असून याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजण्याच्या सुमारास मुसाकाझी बंदर परिसरात सजग अभियान अंतर्गत ड्युटीवर असताना पोलीस पाटील निधी विकास बीदकर यांना समुद्र किनाऱ्यावर एक मृतदेह दिसून आला. जुन्या बंदर विभागाच्या ऑफिसच्या खालील बाजूला हा मृतदेह वाहात आल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत व्यक्तीचे वय साधारण ३५ ते ४० वर्षांच्या दरम्यान असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
या घटनेची नोंद नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ०९/२०२६ बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. सदर व्यक्ती कोण आहे आणि तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास नाटे पोलीस करत आहेत. परिसरातून कोणी बेपत्ता असल्यास किंवा या वर्णनाच्या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








