राजापूर : राजापूर रेल्वे स्थानकावर बुधवारी (दि. २८) घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येणारी रेल्वे अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर येणार असल्याची घोषणा करण्यात आल्याने स्थानकावर एकच गोंधळ उडाला. काही मिनिटांतच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्याची वेळ आल्याने अनेक प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा धोकादायक मार्ग स्वीकारला.
या गोंधळात सर्वाधिक हाल एका वृद्ध महिलेचे झाले. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला जवळ उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकवर चढून कसरत करावी लागल्याचा प्रकार समोर आला. वृद्धेला अशा प्रकारे जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागल्याने उपस्थित प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
नगरसेविका उर्मिला बाकाळकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी सांगितले की, अचानक प्लॅटफॉर्म बदलाची घोषणा झाल्यानंतर प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी गैरसोय झाली. कोणत्याही प्रकारची सुरक्षित पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेकांनी ट्रॅक ओलांडण्याचा धोकादायक निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणारी नेत्रावती एक्सप्रेस आणि मुंबईहून आलेली तुतारी एक्सप्रेस यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. तुतारी एक्सप्रेसला प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सिग्नल मिळाल्याने नेत्रावती एक्सप्रेसला लूप लाईनवर थांबविण्यात आले. त्यानंतर प्लॅटफॉर्म बदलाची घोषणा करण्यात आली. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेचा पुरेसा विचार झाला का, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्थानकावर पादचारी पूल, एस्केलेटर किंवा तत्काळ सुरक्षित मार्ग उपलब्ध नसल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून धावपळ करावी लागली. एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात असून रेल्वे प्रशासनाने या गंभीर प्रकाराची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राजापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ?; प्लॅटफॉर्म बदलाच्या गोंधळात वृद्धेला ट्रकवर चढून गाठावा लागला दुसरा प्लॅटफॉर्म






