GRAMIN SEARCH BANNER

हापूसच्या नावाखाली मद्रासी आंब्याची विक्री करून फसवणूक; कारवाईची मागणी

Gramin Varta
3 Views

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी व देवगड हापूसची ओळख आणि प्रतिष्ठा धोक्यात आणणाऱ्या प्रकारांविरोधात आता आवाज उठू लागला आहे. बाजारपेठेत मद्रासचा आंबा हापूस म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केला आहे. या प्रकाराची कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

श्री. मुकादम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही परप्रांतीय विक्रेते बाजारपेठेत मद्रासचा आंबा हापूस असल्याचे सांगून विक्री करत आहेत. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असून स्थानिक हापूस विक्रेत्यांनाही फटका बसत आहे. ग्राहक व स्थानिक व्यापाऱ्यांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले. मद्रासचा आंबा विकण्यास बंदी नाही, मात्र त्याला हापूस म्हणून विक्री करणे चुकीचे असून अशा प्रकारामुळे रत्नागिरी – देवगड हापूसच्या गुणवत्तेबाबत गैरसमज निर्माण होऊन बदनामी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परराज्यातून येणाऱ्या गाड्यांमधून मद्रासचा आंबा आणून तो हापूस म्हणून ग्राहकांना विकला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे स्थानिक शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक तिन्ही घटकांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी बाजारपेठेत फिरून वस्तूस्थितीची खातरजमा करावी, तसेच मद्रासचा आंबा हापूस म्हणून विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे.

Total Visitor Counter

3368245
Share This Article