मुंबई: राज्यात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २० ते २५ जुलै दरम्यान कोकण, विदर्भ आणि काही मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा ३५ अंशांच्या आसपास पोहोचल्यामुळे उकाड्याचा त्रास जाणवत होता. मात्र, आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा जोर वाढणार असून, त्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार हवेचा दाब कमी झाल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
कोकणात ऑरेंज अलर्ट
२२ आणि २३ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.
यलो अलर्टसह सतर्कतेचा इशारा
आज २० जुलैपासून पालघर, ठाणे, पुण्याचा घाटमाथा, लातूर, धाराशिव, तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह विविध जिल्ह्यांमध्ये विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
पावसाची स्थिती आणि प्रभाव
शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सिंधुदुर्गमधील मालवण येथे सर्वाधिक १४० मिमी पावसाची नोंद झाली. इतर भागांतही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. मात्र, अद्याप राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या राज्यात सरासरीच्या तुलनेत केवळ २४% पावसाची नोंद झाली असून, अनेक जलाशयांत अजूनही पाण्याची आवक नाही.
शेतीसाठी पावसाची गरज
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही भागांत पीक चांगल्या स्थितीत असले तरी लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास किडींचा प्रादुर्भाव वाढून पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. मराठवाड्यात जायकवाडी व्यतिरिक्त इतर प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक फारशी झालेली नाही.
पुढील काही दिवस निर्णायक
सध्या सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करत असून, यानंतर पारंपरिक मान्यतेनुसार पावसाचा जोर वाढतो. त्यामुळे शेतकरी व नागरिकांत पुढील काही दिवसांत चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हवामान खात्याचे आवाहन
कोकण, घाटमाथा आणि विजांसह पावसाचा अंदाज असलेल्या भागांतील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
राज्यात २५ जुलैपर्यंत पावसाचा जोर;कोकण-विदर्भात मुसळधार
